मुंबई : ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना सतत गैरहजार राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही आहे. ईसा संघटनेने तसा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ हजार २०० खाजगी इंग्रजी शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ईसा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये १५ मार्च, २०२० पासून बंद करण्यात आले होते. अशात शैक्षणिक वर्ष २०२०२१ मध्ये जवळपास १५ ते २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणात गैरहजेरी लावलेली आहे. 


त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देणं चुकीचं ठरेल, असं मानत ईसाने या विद्यार्थ्यांना पुढत्या वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी वर्षभर गैरहजर राहिले, त्यांची या वर्षीची फीदेखील शाळेकडून घेतली जाणार नाही, असे ईसाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी सांगितले आहे. 


विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, या विचाराने हा निर्णय घेतल्याचे दायमा यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी स्थलांतर केले, तर अनेकांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र अशांना त्या वर्षाचा अभ्यासक्रम न शिकताच पुढच्या वर्गात प्रवेश देणं योग्य ठरणार नाही, अपुऱ्या ज्ञानाने पुढच्या वर्गात ढकलल्यास विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होईल, असंदेखील ईसा संघटनेचे मानणे आहे.