नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नाशिक भाजपाचे महापौर आणि नगरसेवकांनी नमती भूमिका घेतलीय. मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव मागे घेण्याचा निर्णय भाजपाच्या नगरसेवकांनी घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर आज सकाळी झालेल्या बैठकीत अविश्वास ठराव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबद्दल बोलताना, तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेणार असून चर्चेतून मार्ग काढणार असल्याचं नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितलंय. 


'वॉक  फॉर कमिशनर'ला परवानगी नाकारली पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आज आम्ही नाशिककर वॉक  फॉर कमिशनर असा मोर्चा आज दहा वाजता काढणार होते त्याला स्थानिक मुंबई नाका पोलिसांनी लेखी स्वरूपात परवानगी नाकारली आहे. मात्र, तरीही 'आम्ही नाशिककर' या बॅनरखाली एकत्र आलेल्या संस्था दहा वाजता हा मोर्चा काढणार आहेत. लोकशाहीत असा हक्क असल्याचे सांगत आज शेकडो नाशिककर गोल्फ मैदानात जमणार आहेत आणि पालिकेत मोर्चा काढणार आहेत.


मुख्यमंत्र्यांकडून आदेश 


नाशिककराचा वाढता रोष आणि आज आयोजित करण्यात आलेला वॉक फॉर कमिशनर बघता मुख्यमंत्र्यानी थेट अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले होते. करवाढ लादल्याच्या  कारणावरून सत्ताधारी भाजपने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाची खेळी पक्षावर उलटत आहे हे लक्षात घेऊ स्थानिकांना तो प्रस्ताव मागे घेण्याची सूचना करण्यात आल्या.... आणि या आदेशांची तत्काळ दखल घेत अविश्वास मागे घेण्याविषयी नगरसेवकांना थेट संदेशही धाडण्यात आलेत.


करात शिथिलता... 
दरम्यान नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू असतांना आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. लोकप्रतिनिधी आणि नाशिककरांच्या भावनांचा आदर राखत आयुक्तांनी करवाढीमध्ये शिथिलता आणलीय.