मुंबई : राज्याभरात दुष्काळाच्या झळा पोहोचत असताना आता मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईत आधीच मोठ्या प्रमाणात पाणी कपात सुरु असून येणाऱ्या काळात गंभीर परिस्थीती उद्भवू शकते. पण अधिक पाणी कपात न करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने जारी केल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकर पाऊस पडावा यासाठी मुंबईकर प्रार्थना करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिक पाणीकपात करणार नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत स्पष्ट केले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत गेल्यावर्षी पाऊस कमी पडल्याने दोन लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पालिकेने नोव्हेंबर २०१८ पासून १०% पाणी कपात लागू केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत सध्या २ लाख ४३ हजार दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिलल्क आहे. 



गेल्यावर्षी याचवेळी ४ लाख २७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत १ लाख ८४ हजार दशलक्ष लीटर इतका कमी आहे. मात्र हा पाणीसाठा जुलै २०१९ पर्यंत पुरेल इतका आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला तरच मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.