प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगड जिल्‍हयातील आंबेत या माजी मुख्‍यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्‍या जन्‍मगावात एकेकाळी सर्व प्राथमिक सुविधा उपलब्‍ध होत्‍या. आज मात्र इथले ग्रामस्थ या सर्व सोयींपासून वंचित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेत, रायगड आणि रत्‍नागिरी जिल्‍हयाच्‍या सीमेवरील सावित्री नदीच्‍या तीरावर वसलेलं गाव. माजी मुख्‍यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं जन्‍मगाव अशी या गावाची स्‍वतंत्र ओळख...


अंतुले यांनी आपल्‍या उमेदीच्‍या काळात गावात अनेक सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या. मग पिण्‍याचं पाणी असेल. दवाखाना असेल, अद्यावत एसटी बस स्‍थानक असेल. मात्र आज यातील एकही बाब शिल्‍लक नाही. गावातलं एसटी स्थानकच इथल्या दुरवस्थेची प्रचिती देतं...


जी अवस्‍था एसटी स्‍थानकाची, तीच सरकारी दवाखान्‍याची... ज्‍या काळात ग्रामीण भागात कुठंच आरोग्‍य यंत्रणा नव्‍हती त्यावेळी सुरू झालेल्‍या आंबेतच्‍या या दवाखान्‍याची अवस्‍था आज  एखाद्या पडक्‍या वाडयापेक्षाही भयानक आहे... 


तीन एकर जागेतील सुविधा युक्‍त आरोग्‍य केंद्र आता बंदच आहे. शेजारी उपकेंद्राची इमारत अलीकडेच उभी राहिली परंतु तिकडे कुणी फिरकतच नाही. गावातील प्राथमिक शाळेची इमारत वरून चांगली दिसत असली तरी आतून पोखरलीय.  विद्यार्थी जीव मुठीत धरून व्‍हरांडयात शिक्षण घेतायत.


एकेकाळी सर्व सुविधांनी युक्‍त असलेल्‍या या गावाला आता कुणीच वाली उरला नाही अशीच भावना आंबेतच्‍या ग्रामस्‍थांची झालीय.