अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, उस्मानाबाद जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत
उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा फक्त 29 टक्के पाऊस
उस्मानाबाद : राज्यात सगळीकडे पाऊस कोसळत असला तरी उस्मानाबाद जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा फक्त 29 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाने शून्य टक्क्यापेक्षा खालची पातळी गाठली आहे. त्यामुळे यापुढील काळात पाऊस पडला नाही तर भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस नुसता कोसळतो आहे. या पावसामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला आहे. चांदोरी, करंजगाव आणि सायखेडा या गावांना पुराने वेढा दिला आहे. तसेच चांदोरी व सायखेडा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गोदाकाठावरील ३० ते ३५ गावांना जोडणाऱ्या सायखेडा पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग शनिवारी सायंकाळपासून बंद करण्यात आला आहे. तर नाशिक-औरंगाबाद महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आल्याने राजापूर बाजारपेठेत पुराचा वेढा कायम आहे. शिवाजी चौकात सात फूट पाणी आहे. सोमवारी शिवाजी पथ, मार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरलं होतं. आजही हीच स्थिती आहे. पावसाचा जोर आजही तसाच आहे.
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
अर्जुना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पाचल-तळवडे रस्त्यावरील पुलावर पाणी आलंय. दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आलेली असून पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.
रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.सावित्री आणि गांधारी या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. रात्री महाड शहरात पुराचे पाणी शिरले होते. बाजारपेठेत कंबरेपर्यंत पाणी होतं. भगवानदास बेकरीपर्यंत पाणी होते. चवदार तळ्यातून पाणी बाहेर फेकले जात होते.
गांधारी नदीवरील पूल सध्या पाण्याखाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाचा जोर कमी असला तरी जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी लष्करासह एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.