मुंबई : शिक्षण शुल्कासंदर्भात (School Fee) शाळा, पालकांनी समन्वयानं निर्णय घेणेच योग्य आहे. शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत. कोरोना काळातल्या शुल्काचा वाद टोकाला पोहोचला आहे. काल पुण्यात पालकांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घातला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, वर्षा गायकवाड या पुणे दौऱ्यावर असतांना पुण्यातील पालकांनी वर्षा गायकवाड यांना घेराव घातला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. वर्षा गायकवाड या फी आणि परीक्षा संदर्भात ठोस भूमिका घेत नसल्याने पालक चांगलेच आक्रमक झाले होते. बालभारती भवनासमोर पालकांनी शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 30 जानेवारीपर्यंत फी वाढीसंदर्भात राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला नाही आणि प्रवेश सुरू झाले नाहीत तर वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी यावेळी दिला.
 
कोरोना काळात शुल्क भरले नाही म्हणून एकाही शाळेने मुलांचे शिक्षण थांबवू नये, अशा सक्त सूचना आपण दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.


पुण्यात काही शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणून देत आहेत. त्यांना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार पुढे आले आहेत. काही शाळांमध्ये असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर प्रा. गायकवाड यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली.