पिंपरी-चिंचवड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी जास्तीत जास्त लसीकरण व्हावं यासाठी राज्य तसंच जिल्हा स्तरावर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. पण असतानाही काही नागरिक लस घेण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. इतकंच नाही तर काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही अद्याप लस घेतलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लस न घेतलेल्या अशा सरकारी कर्मचाऱ्यांना समज देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं एक आदेशच काढला आहे. 'लस घेतली नाही तर पगार मिळणार नाही' असा आदेशच पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. यासाठी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना 20 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.


महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढत कर्मचाऱ्यांना लस घेण्याची ताकीद केली आहे. महानगरपालिकेत एकूण 7 हजार 479 अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. पण वारंवार सूचना देऊनही अनेकांनी लसीकरण करून घेतलं नाही. त्यामुळे पगार स्थगित करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.


महानगरपालिकेत वारंवार सांगूनही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतलेलं नाही. काही जणांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळेच महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना 20 जुलैची डेडलाईन दिली असून लसीचे दोन्ही डोस न घेतल्याचे निदर्शनास न आल्यास त्यांचा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याचा विचार केला जाईल अशी शक्यता आयुक्तांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.