गोंदिया : कोरोना प्रतिबंध लस घेतलीत का? जर तुम्ही लस घेतली नसेल तर लवकरात लवकर घ्या...कारण तुम्ही लस न घेतलेल्या व्यक्तींना आता पगार मिळणार नाहीये. होय हे खरं आहे. गोंदियामध्ये आता लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदियातील जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीमेला वेग मिळण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


गोंदिया जिल्ह्यात कोविड लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आता थेट ‘अ‍ॅक्शन मोड’वर येत लस न घेणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन नामंजूर करण्याचे आदेश जिल्हा कोषागार कार्यालयास दिले आहे. त्यामुळे आता वेतन देयकासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे.


गोंदिया जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे प्रथम डोसचं प्रमाण 89 टक्के आहे. अजूनही जिल्ह्यात 11 टक्के पात्र नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचं प्रमाण 100 टक्के होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात पाठवावं.


ज्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सादर होणार नाही, त्यांचे डिसेंबर वेतन देण्यात येणार नाही. यासंदर्भातचं पत्र जिल्हाधिकार्‍यांनी  जारी केलं आहे. या आदेशाने कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.