नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजारसमित्यांमधले सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.  दररोज होणारी पन्नास कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आज पस्तीस हजार क्विंटल कांदा खरेदी व्यवहार बंद झाल्यामुळं समित्यांच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. कांद्याची राजधानी समजल्या जाणा-या पिंपळगावात आज सगळे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2) शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा मोठा परिणाम दूध वितरणावरही झालाय. नाशिकमध्ये दुधाची 25 ते 30 टक्केच आवक झालीय. शहरातल्या गोठ्यांमधूनही दुधाचा पुरवठा कमी झालाय. बंदमध्ये दूध व्यावसायिकही सहभागी झालेत. त्यांनी दुधाची दुकानं बंद ठेवलीत. 


3) येवला शहरात आजच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. येवल्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. धामणगावमध्ये शेतक-यांनी वांगी, कांदे रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. काही ठिकाणी दूधही रस्त्यावर ओतण्यात आलं. ठिकठिकाणी घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध करण्यात आला. चांदवडमध्येही आठवडे बाजार बंद असून कडकडीत बंद पाळण्यात आला.  लासलगाव शहरातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून,  बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. तर निफाड मध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय.  


4) संपकरी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी येवला शहर आणि तालुका बंद चक्क शिवसेनेने पुकारला. भाजपा वगळता सेनेच्या नेतृत्वात सर्वपक्षीयांच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. 


5) नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात बंदची तीव्रता अधिक जाणवली. राहता, श्रीरामपूर तालुक्यातल्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. पुणे नाशिक  महामार्गावर आंबीखालसा फाटा इथे आंदोलक रस्त्यावर झोपून आंदोलन केलं. पार्थडी, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातही कडकडीत बंद पाऴला गेला. कर्जतमध्ये आजचा आठवडी बाजारही बंद आहे.  


6) कोपरगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकरी तसेच सर्व पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरात आंबेडकर स्मारक जवळ जमवून शेतकऱ्यांनी मुंडन केलं. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत शहरातून मोर्चा काढला तर शहरातील गांधी चौक येथे निषेध सभा घेऊन तहसीलदारांना निवेदन दिलं. 


7) अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला. शेतकर्यांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडन केले. सरकारने लवकरात लवकर शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.


8) धुळे जिल्ह्यात शिवसेनेनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिरपूर तालुका वगळता जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, साक्री तालुक्यात शिवसेना बंदचा परिमाण दिसून आला. धुळे, शिंदेखडा आणि साक्री तालुक्यात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून व्यापारी प्रतिष्ठान बंद करायला लावली. 


शिंदखेडा येथे काही व्यापाऱ्यांनी शिवसैनिकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. धुळे शहरात शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असेलेल्या आग्रा रोडवरील दुकान यावेळी शिवसैनिकांनी बंद केली. भाजीपाला बाजारातही बंद आणि संपाचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला.