रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा शहरात पाचशेच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाचशेच्या नोटा घड्या घालतातच तुटून पडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार दाखविला आहे. उष्णता वाढल्यामुळे हा प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खानापूर तालुक्यतील विटा येथे पाचशेच्या नोटा वाळलेल्या पानाप्रमाणे तुटू लागल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले आहे. पाचशे रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती. ती बदलून देण्यात आली आहे. पण उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही असं उत्तर एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. 


राठोड यांनी जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांच्या बाबत हा प्रकार घडला असल्याचा दावा केला आहे. याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.



अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते. ती रोजंदारीवर मोलमजुरी करते. तिला दीड महिन्यापूर्वी सात हजार रुपये मिळाले होते ते तिने पाकिटात टाकून कपाटात ठेवले होते. त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढून रुमालात बांधून मिरच्या आणण्यासाठी बाजारात त्या गेल्या. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच 500 ची एक नोट घडी पडून तुकडे झाल्याचे आढळले. यावर त्या महिलेने श्री राठोड यांच्याकडे जाऊन घडलेला प्रकार सांगितला.


राठोड यांनी तात्काळ विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या संपर्क साधला. त्यांनी ही गोष्ट आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणावी असा आग्रह केला. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटेच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत. असे शाखा व्यवस्थापक यांनी सुद्धा मान्य केले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.