COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : अग्निशमन परवाना नसल्यामुळे महापालिका क्षेत्रातील २२४ शाळा खासगी क्लासेसना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये अग्निशामक परवाना न घेतल्याने सांगली शहरातील दोन नामांकित खाजगी क्लासेसचे पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने अग्निशामक विभागाकडून करण्यात आली आहे. पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याबाबत चाटे कोचिंग क्लासेस आणि राजपूत क्लासेसवर कारवाई करणयात आली आहे.


सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शाळा महाविद्यालय आणि खाजगी क्लासेसना अग्निशमन परवाना नसल्याच्या कारणावरून महापालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. 


महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी या नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये सांगलीतील दोन खासगी क्लासेसचा पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.


सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये मोठ्या संख्येने शाळा महाविद्यालय आणि खाजगी क्लासेस कार्यरत आहेत. या शाळा महाविद्यालय आणि क्लासेसकडून महापालिकेचा अग्निशमन परवाना घेण्यात आलेला नाही.



याबाबत गेल्या सहा महिन्यापासून अग्निशमन विभागाकडून संबंधित शाळा महाविद्यालय आणि क्लासेसना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत मात्र यात क्लासेस व शाळांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. 


महापालिकेच्या आकडेवारीनुसार सांगली शहरात ४२ शाळा ७० क्लासेस तर मिरज शहरात ३२ क्लासेस ४० शाळांनी महापालिकेचा अग्निशमन परवाना घेतलेला नाही.  


त्यामुळे या सर्वांनी अग्निशमन परवाना तातडीने घ्यावा याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार संबंधितांना यापूर्वीही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 


विद्यार्थ्यांचे नुकसान नको या उद्देशाने गेले अनेक महिने महापालिका प्रशासनाकडून फक्त नोटीस बजावून सर्वांना सुचित करण्यात आलं होतं मात्र वारंवार नोटिसा पाठवूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अखेर अग्निशमन विभागाला पुढील कारवाईचे आदेश दिले होते. 


यानुसार प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगलीतील दोन नामांकित कोचिंग क्लासेसच्या इमारतीचा पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. 


याचबरोबर वारंवार नोटिसा बजावूनसुद्धा महापालिकेचा अग्निशमन परवाना न घेणाऱ्या शाळा महाविद्यालय आणि खाजगी क्लासेसवर वीज-पाणी  तोडण्याची कारवाई केली जाणार असल्याचे प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगितले.