एसटी चालकपदी महिला... महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य!
एसटी महामंडळने नुकतीच खास कोकणासाठी १४ हजार पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये चालक पदासाठी सुमारे ४५० महिलांचे अर्ज आले आहेत.
मुंबई : एसटी महामंडळने नुकतीच खास कोकणासाठी १४ हजार पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये चालक पदासाठी सुमारे ४५० महिलांचे अर्ज आले आहेत.
या महिला सेवेत रुजू झाल्या तर सार्वजनिक बस वाहतूक सेवेत देशात पहिल्यांदाच महिला चालक असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याचा दावा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. काही महिन्यांनंतर महिला चालक अवाढव्य अशा स्टेट ट्रान्सपोर्टचे धूड चालवताना बघायला मिळतील.
एसटीमध्ये चालक-वाहक आणि अन्य पदांसाठी ही भरती असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरतीसाठी परीक्षा होणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच महिला चालकांच्या पदांचादेखील समावेश करण्यात आलाय हे विशेष.
उल्लेखनीय म्हणजे, तांत्रिक कारणांमुळे तब्बल दीड वर्ष रखडलेली 'शिवशाहीट वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दाखल करण्यात आलीय. दाखल झालेल्या या वातानुकूलित बसची सेवा १० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत रत्नागिरीसह मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, शेगाव, शिरपूर, परभणी, जळगाव, लातूर, बीड या मार्गांवर टप्प्याटप्प्याने एसटीच्या स्वमालकीच्या १ हजार अत्याधुनिक शिवशाही धावणार आहेत. तसेच एसटीच्या शयन बसही लवकरच ताफ्यात येणार आहेत.