डोंबिवलीत तेलमिश्रीत पावसाने नागरिक हैराण
पावसाच्या पाण्यावर तेलाचे तवंग
ठाणे | डोंबिवली एमआयडीसी परिसरात तेलमिश्रित पाऊस पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर पावसाच्या पाण्यावर तेलाचे तवंग आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एमआयडीसीपरिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. त्यामुळे शहरात प्रदुषणाची समस्या कायम आहे. याच प्रदुषणामुळे तेलमिश्रित पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान यासंदर्भात प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली असून, इथल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू पाण्याच्या संपर्कात आल्यानं पावसाच्या पाण्यावर तवंग आल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
डोंबिवलीत याआधीही हिरवा पाऊस पडला आहे. तर गेल्या वर्षी दावडी गावातील गणेशमूर्ती काळवंडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनानं याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.