कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी :  बॉयफ्रेंडसाठी (Boyfriend) मोठ्या बहिणीने चक्क लहान बहिणीला संपवल्याची धक्कादायक घटना कोपरगाव (kopargaon) येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लहान बहिणीला संपवल्यानंतर मोठ्या बहिणीने आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र तपासानंतर मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीला संपवल्याचे समोर आलं आहे. (Older sister ends up younger sister for boyfriend)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिल्याच्या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी एका 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र आत्महत्या नसून हत्या झाल्याचे तपासात उघड झालं आहे.  ही हत्या तिच्याच मोठ्या बहिणीने केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी तपासानंतर केला आहे. 


शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच मृत्य झालेल्या मुलीच्या आईच्या फिर्याद दिली होती. त्यानंतर आरोपी असलेल्या मोठ्या बहिणीवर कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आंधळ्या प्रेमापोटी मोठ्या बहिणीने सख्या लहान बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


दरम्यान, 19 वर्षांच्या बहिणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलाने आरोपी मुलीला एक मोबाईल दिला होता. त्यानंतर हा मोबाईल लहान बहिणीच्या हाती लागला. तिने तो मोबाईल आई-वडिलांकडे दिला. त्यानंतर मुलीच्या पालकांना तिचे कॉलेजला जाणे बंद केले. याचाच राग मोठ्या बहिणीच्या होता. त्यानंतर प्रियकरासोबत पळून जात असलेल्या मोठ्या बहिणीला लहान बहिणीने अडवलं. यानंतर संतापलेल्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केली आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला.


मात्र बहिणीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसात आरोपी बहिणीने आपल्या प्रियकरासोबत लग्न केल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी तरुणीला अटक केलीय.