पुण्यात बस स्टॉप गेलाय चोरीला, माहिती देणाऱ्यास इतकं बक्षीस
बस स्टॉपची माहिती देणाऱ्याला ५ हजारांचं बक्षीस
पुणे : पुणे तिथे का ऊणे ? असं म्हणतात. पण पुण्यात आता एका बस स्टॉपचं ऊणं जाणवायला लागलयं. एक कथित बस स्टॉप चोरीला गेल्याची चर्चा सध्या पुण्यात आहे. बाईक, कार चोरी झाल्याच्या घटना आपण आतापर्यंत ऐकल्या असतील पण पहिल्यांदाच पुण्यात आख्खाच्या आख्खा बस स्टॉपचं चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय.
चोरी झालेल्या बस स्टॉपची माहिती देणाऱ्याला ५ हजारांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. शहरामध्ये असे बॅनर देखील लागले आहेत. एका इंटरनेट यूजरने बॅनरचे फोटो देखील शेअर केले आहेत.
स्थानिक नेता प्रशांत म्हस्के यांनी हे पोस्टर लावल्याचे वृत्त समोर येतेय. बी.टी.कावडे पॅलेस समोरील पुणे महानगर परिवहनचा नागरिकांच्या सोयीचा बसस्टॉप चोरीला गेलाय असे बॅनरवर लिहिण्यात आलंय. कोणाला दिसल्यास संपर्क साधा. ५ हजारांचं बक्षीस देण्यात येईल असेही पुढे म्हटलंय.