चिंता वाढली! राज्यात 3 लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण
लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोसबाबत लवकर निर्णय घेण्याचा मागणी
मुंबई : ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. मुलांच्या लसीकरणासंबंधी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
केंद्राने लवकर निर्णय घ्यावा
लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी केली आहे. कारण पिंपरीमधील ओमायक्रॉन झालेल्या 6 जणांपैकी 3 लहान मुली आहेत. 12, 7 आणि दीड वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
एक 44 वर्षीय महिला 2 मुलीसंह नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आली होती. ती आपल्या भावाला भेटायला आली होती. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 2 मुली, भाऊ आणि त्याच्या 2 मुली अशा एकूण 6 जण ओमायक्रॉनबाधित आढळले. यापैकी 3 मुली अल्पवयीन आहेत.
केंद्राचा निर्णय स्वागतार्ह असेल
लहान मुलांचं लसीकरण, बूस्टर डोस देण्याबाबत या बैठकीत केंद्राने निर्णय घेतल्यास हा निर्णय स्वागतार्ह राहील अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते. ज्या ठिकाणी शाळा बंद आहे तिथल्या शाळा लवकर सुरू करा अशी सूचना करण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.
राज्याच्या टास्क फोर्सची अंतर्गत मिटिंग आज होणार असून या बैठकीत राज्यातील ओमायक्रॉन बाबत आढावा घेतला जाणार आहे. लहान मुलांना लसीकरण करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळण्यासाठी आग्रह या बैठकीत धरला जाणार असून बूस्टर डोससाठीही केंद्राकडे आग्रह धरण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं देखील टोपे म्हणाले.
राज्यात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण
सध्या राज्यात 8 रुग्ण असून काँटॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरू आहे. विमानतळावर स्क्रिनिंग सुरू असून पॉझिटिव्ह असलेल्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात आहे. सध्या राज्यात जिनोमिक सिक्वेसिंगच्या 3 लॅब असून आणखी 2 लॅब वाढवणार आहे. या संदर्भात लवकर मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन औरंगाबाद आणि नागपूर इथं आणखी 2 लॅब सुरु करू असंही ते म्हणाले.
राज्यात तात्काळ कठोर निर्बंध नाहीत
राज्यात लगेच सध्या कोणतेही निर्बंध लावले जाणार नाहीत, ज्या शाळा सुरू नाही त्या शाळा सुरु कराव्या हाच आमचा विचार आहे, असंही टोपे यांनी सांगितलं आहे.
सभा समारंभ लग्न यात गर्दी वाढली असून तेथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळावे नियम न पाळलयास या संदर्भात कडक कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले. पॉंडेचरीमध्ये लसीकरण सक्तीचं करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात लसीकरण सक्तीचं होणार नाही असंही यावेळी टोपे यांनी सांगितलं आहे.
---