MahaRERA Project Details: घर खरेदी करणे हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असते. आपल्या आयुष्यभराची जमापुंजी वापरून घर खरेदी केले जाते. मात्र, अनेकदा विकासकांकडून म्हणजेच बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक होते. अशावेळी बिल्डरची तक्रार कुठे नोंदवायची असे प्रश्न ग्राहकांना पडतात. विकासकांच्या ग्राहकांप्रती उदासीनतेची महारेराने घेतली गंभीर दखल घेतली आहे. घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विकासकांनी "तक्रार निवारण कक्ष" ( Complaint Redressal Cell ) स्थापन करणे आवश्यक असल्याचे निर्देश महारेराने दिले आहेत. निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी महारेरा विशेष प्रयत्न करणार आहेत. महारेराच्या निर्देशानंतर आतापर्यंत फक्त 195 प्रकल्पांनी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याचे आढाव्यात स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरखरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करावी, असे निर्देश महारेराने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिले होते. त्याचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील फक्त 195 प्रकल्पांनी अशा कक्षांची स्थापना करून अपेक्षित तपशील संकेतस्थळावर नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष प्रयत्न करणार आहे.


सुरूवातीला घर खरेदी करताना किंवा नोंदणी करताना प्रकल्पाची पणन यंत्रणा ग्राहकांच्या  संपर्कात असते. नंतर  काही तक्रारी असल्यास, अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा हे अनेक प्रकल्पांत निश्चित केलेले नसते. अशावेळी त्या ग्राहकाने कुठे जावे हे त्याला कळत नाही. परिणामी त्याची तक्रार सोडवून घेण्यात त्याला अडचणींना सामोरे जावे लागते. यातून अनेकदा अधिकृतपणे विश्वासार्ह माहिती मिळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊन तक्रारी वाढतात. त्यातून प्रकल्प पूर्णतेतही अडचणी येऊ शकतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी "तक्रार निवारण कक्षाची" ( Grievance Redressal Cell ) स्थापना करावी, असे निर्देश महारेराने एका परिपत्रकाद्वारे सर्व विकासकांना दिले होते. 


तक्रार निवारण कक्षात याच कामासाठी समर्पित किमान एक तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्प स्थळी ठळकपणे प्रदर्शित करावे. शिवाय विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही  सूचना महारेराने केलेली होती. समर्पित तक्रार निवारण कक्षांमुळे  तक्रारदाराला वेळीच अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळायला मदत होईल. शिवाय विकासकांनी किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निवारण केले ,याचा तपशीलही संकेतस्थळावर टाकल्यास प्रकल्पाची विश्वासार्हता वाढायलाही मदत होईल.