उस्मानाबादमध्ये बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांना अटक
२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या बीड येथील २ कर्मचा-यांसह, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
महेश पोतदार झी मेडिया उस्मानाबाद : २० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या बीड येथील २ कर्मचा-यांसह, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून बँकांची आणि मोठ्या कार्पोरेट कंपन्यांची आर्थिक फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता असल्याने ठेवीदारात खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद शहरातील आयसीआयसीआय बँकेमधून बनावट चेकचा वापर करून हर्बल लाईफ इंडिया या बंगळुरु येथील कंपनीच्या खात्यातून २० कोटी रक्कम हडप करण्याचा हेराफेरीचा प्रकार उस्मानाबाद पोलिसांनी उघड केला आहे.
बँकेने कोणतीही खातरजमा न करता एका तासात हा २० कोटी रुपयांचा चेक फुलाई मल्टी स्टेटच्या खात्यात वर्ग केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उस्मानाबादमधील आयसीआयसीआय बँकेच्या फिर्यादीवरून आंनद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरुच्या हर्बल लाईफ इंडिया या कंपनीचा बनावट चेक बनवून संगनमताने, एकाच तासांमध्ये उस्मानाबादच्या फुलाई मल्टी स्टेटच्या नावाने २० कोटी रुपयांचा चेक वठवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यातील १६ कोटी रुपये फुलाई मल्टी स्टेटच्या खात्यात जमा करून, त्याच दिवशी यातील ४ कोटी रुपयांची रोख रक्कम बीडच्या ६ ते ७ जणांच्या टोळीच्या हवाली, उस्मानाबादच्या फुलाई मल्टी स्टेट पतसंस्थेने केली होती.
त्यावेळी या टोळीने रक्कम घेऊन जाण्यासाठी वापरलेली बोलेरो जीप ही पोलिसांनी आता जप्त केली आहे. बीडच्या आयसीआयआय बँकेचे कर्मचारी सय्यद फरहान, नरेश राठोड, चालक सुंदरआबा पोफळे तसेच धिरज कोळी, वैभव कोटेचा, फुलाई मल्टी स्टेट चे चेअरमन मारुती खामकर, सी ईओ प्रदीप खामकर यांना पोलिसांनी संगनमताने फसवणूक केल्याच्या आरोपवारून अटक केली आहे.
बँकिंग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी संगनमताने केलेला आर्थिक घोटाळा उघड करताना पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदल्याने अनेक गंभीर प्रकार समोर येत आहेत.
२० कोटी रुपयांचा चेक कोणतीही चौकशी न करता एका तासात आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कसा काय क्लियर केला याचा तपास पोलीस करत असून कोरा चेक आणून देणा-या मास्टर माईंड चे नेटवर्क ही देशपातळीवर असल्याचे पुरावे समोर येत असल्याने देशपातळीवरील या नेटवर्क ला उध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसां समोर ही निर्माण झाले आहे.