आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : ताडीचं अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्य झाल्याची घटना डोंबीवली कोपर परिसरात घडली आहे सचिन पाडमुख  आणि स्वप्नील चोळके अशी दोन मृत तरुणांची नाव आहेत .स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता.  मात्र दोन महिन्याअसून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता. तर सचिन हा  एका खाजगी कंपनीत कामाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ताडी विक्रेता रवी भटनी हा फरार असून त्याचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. 


नेमकी घटना काय?
डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख  आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल संध्याकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख आणि स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.


त्यांच्या मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात नेण्या आधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात विक्रेता रवी भटनी विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. 


दरम्यान या दोघांचा मृत्यू ताडीच्या अतिसेवन केल्याने झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचं विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितलं. मयत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे