मुंबई : ‘पद्मावत’ सिनेमाच्या विरोधात करणी सेनेने देशभरात आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरू केली असून त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे. 


मुंबईत ५० कार्यकर्ते ताब्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत या सिनेमाला वाढता विरोध पाहता प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबईत करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


नाशिकमध्येही धरपकड


नाशिकमध्ये गंगापूर धरणावर जलसमाधी घेण्यासाठी गेलेल्या करणी सेनेच्या तीस पस्तीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ‘पदमावत’ सिनेमाच्या रिलीजबाबत विरोध केला जात आहे. 


पुण्यात तोडफोड


पद्मावत चित्रपटाला करणी सेनेचा विरोध कायम आहे. या चित्रपटाला विरोध करण्यासाठी मंगळवारी काही कार्यकर्त्यांनी पुण्यात सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड केली. त्या १८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. असं असलं तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये या मागणीवर करणी सेनेसह विविध संघटना ठाम आहेत. पद्मावतला विरोध करण्यासाठीचं आंदोलन सुरुच राहणार असून त्यातून काही अनुचित घडल्यास आपण जबाबदार राहणार नसल्याचं संघटनेनं म्हटलंय. 


नदीच्या पात्रात आंदोलन


‘पद्मावत’ला विरोध म्हणून अनेक तरूण आणि महिला तापी नदीच्या पाण्यात उतरले आहेत. काल रात्री दहा अंश सेल्सीअस तापमानातही हे आंदोलक पाण्यात होते. दोंडाईचा पोलीस या आंदोलकानवर लक्ष ठेवून असून त्याना पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.