चित्रकला स्पर्धेतून रेखाटलं अवयवदानाचं महत्त्व
सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!
मुंबई : सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!
विद्यार्थी दशेत सामाजिक भान जागृत करण्याच्या उद्देशाने डोंबिवली स्थित 'रघुकुल शैक्षणिक संस्थे'ने शालेय विद्यार्थ्यांसाठी एका चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५७ शाळांमधून ६ ते १४ वयोगटातील १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे भाग घेतला.
'अवयव दान... जीवन दान' हे घोष असलेल्या या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत दुसरी ते दहावी पर्यंत तीन गटांत विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून अवयवदान, बेटीबचाव, बालमजुरी, व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, पर्यटनस्थळांची निगा, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, पाण्याखालचे जग आदी विषयांवरील चित्रं रेखाटली. विद्यार्थांमधील उत्साह, विषयाची जाण आणि कल्पकता पाहून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक विभागाचे परिक्षक अवाक झाले.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे सामाजिक भान जागृत व्हावे, आपणही समाजाचे देणे लागतो, ही भावना मुलांमध्ये रुजविण्यासाठी चित्रकलेचा उपयोग करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते.