Thane News : भिवंडीमध्ये (Bhiwandi) पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा (Pakistan Zindabad slogans ) देण्यात आल्या आहेत.  धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात या घोषणा देण्यात आल्या आहेत. महापालिकेसमोर शालेय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हम तो पाकिस्तान है म्हणत चक्क पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडीत विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 


आंदोलनादरम्यान एका 12 वर्षाच्या मुलाने हातात माईक घेतला आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिली. या मुलाच्या जवळच आंदोलनाचा आयोजक उभा होता. तोच या मुलाला काय बोलायचा याची सूचना करत होता. ''पाकिस्तान झिंदाबाद"च्या घोषणा दिल्याने आंदोलन भरकटले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतले. भिवंडी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.   


पुण्यात झाली होती पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी


यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यात झाली होती पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी.  पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही घोषणाबाजी करण्यात आली होती. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ राज्यभर संतापाची लाट उसळली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईचा इशारा  दिला होता.