सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी  44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत प्रमुख पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे यांनी उमेदवारी दाखल केला आहे. Pandharpur Bypoll Election


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोटनिवडणुकीमध्ये या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार असली, तरी या दोन्ही पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन शिंदे पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. 


शैला गोडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार


तर शिवसेनेच्या माजी महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान शैला गोडसे यांना शिवसेनेने पक्षातून निलंबित केले आहे.


समाधान आवताडे यांच्या चुलत भावाचाही उमेदवारी अर्ज


भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अवताडे यांना घरातूनच आव्हान मिळाल्याचं पाहायला मिळतंय. तर पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले त्यांचे पती नागेश काका भोसले यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे भाजप ला बंडखोरांची समजूत काढावी लागणार आहे.


अभिजित बिचुकले देखील नशीब आजमवणार


इतर उमेदवारांमध्ये प्रत्येक वेळी निवडणूक लढवणारे अभिजीत बिचुकले यांनीसुद्धा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. ओबीसी जन मोर्चाकडून माऊली हळणवर हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.


3 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी निवडणुकीसाठी किती उमेदवार रिंगणामध्ये असतील हे चित्र स्पष्ट होणार आहे. 17 एप्रिल रोजी मतदान असणार आहे.