सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर  : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये ३५ गावच्या पाण्याचा पुन्हा मुद्दा चांगलाच गाजतोय. दुसऱ्या लोकांचे पाणी चोरणारे लोक मंगळवेढ्याला पाणी काय देणार ? अशी घणाघाती टीका भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर केली आहे. भारतीय जनता पार्टीने पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची जबाबदारी माडाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दिली आहे. ते मतदारसंघां मध्ये प्रचारात सहभागी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2009 च्या निवडणुकीपासून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा बनवला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या गावांसाठी दोन टीएमसी पाणी देण्या संदर्भात प्रयत्न करू असे सांगितले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेवर भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार टीका केली आहे. नीरा देवघर मधील पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्याच्या वाट्याचं असलेलं पाणी ज्या लोकांनी चोरलं ते लोक मंगळवेढ्यातील या गावांना काय पाणी देणार? 


दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकार राज्यांमध्ये सत्तेत आहे.दोन टीएमसी पाणी देण्याची भाषा करणाऱ्यांनी आतापर्यंत दोन बादल्या पाणी तरी या लोकांना दिलं का ? याच उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.


कृष्णा खोरे विकास महामंडळाचे आपण उपाध्यक्ष असताना पस्तीस गावच्या पाणी योजनेला मंजुरी मिळवण्यात आपला सहभाग आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आचार संहिता लागण्यापूर्वी या योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. 


या मतदारसंघाचा आपला कसलाही संबंध नसताना दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या मैत्री पोटी आपण ही मदत केल्याचा गौप्यस्फोट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. अशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न हा या निवडणुकीतील प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसते.