बीड :' राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या २६ जून रोजी भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे' असे आवाहन भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चक्का जाम' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ.प्रितम मुंडे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, राजेंद्र मस्के,  भीमसेन धोंडे, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, राम कुलकर्णी, निळकंठ चाटे, डॉ लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते.


ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे दुर्दैवी आहे. केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवावे लागेल. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने आपण यशस्वी केली आहेत, हे आंदोलनही यशस्वी करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.