गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : लग्नाआधीच एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपल्याचा धक्कादायक प्रकार परभणीच्या (Parbhani News) जिंतूर तालुक्यात घडला आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची नावे सांगणारा एक व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला होता. लिंबाच्या झाडाला गळफास घेत तरुणाने स्वतःला संपवले आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी  (Parbhani Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. माझ्या मृत्यूला हे लोक जबाबदार आहेत असे सांगत माऊली रावसाहेब जावडे या 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. माऊली जावडे या तरुणाने आत्महत्येपूर्वी माझ्या मरणासाठी गावातील गणपत जवडे, उद्धव कुकडे, बाळू जवडे हे तिघेजण कारणीभूत आहेत, असे सांगणारा एक व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर माऊलीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.


माऊलीने व्हिडीओ व्हायरल करुन आत्महत्या केल्याची बातमी गावात पसरताच सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकाराची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह चिंचोली काळे गावात धाव घेतली आणि तपासास सुरुवात केली. त्यानंतर माऊलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांना तात्काळ अटक करावी यासाठी त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी बोरी पोलीस ठाण्यामध्ये एकच गर्दी केली. यावेळी त्याच्या नातेवाईंकांनी माऊलीचे शवविच्छेदनही रोखून धरले होते. त्यानंतर बोरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.


दरम्यान, आपल्या मरणाला गावातील गणपत जवडे,उद्धव कुक्कडे आणि बाळू जवडे हे तिघे जण जबाबदार असल्याचे माऊलीने या व्हिडिओमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत माऊलीचे लग्न काही दिवसावरच येऊन ठेपले होते, अशी माहिती देखील समोर आली आहे. 


प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू


दरम्यान, परभणी शहरातील इकबालनगर भागातील जिकरिया हॉस्पिटलमध्ये प्रसृतीनंतर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी डॉक्टरांना दोषी ठरवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रसृतीदरम्यान, झालेल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांच्या गोंधळामुळे रुग्णालयाच्या परिसरात रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेताच तणाव निवळला. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.