गजानन देशमुख, झी २४ तास, परभणी : दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातला शेतकरी हैराण झालाय. परभणीतील पिंगळीमध्ये शेतकऱ्याने बैल नसल्याने लेकींना औताला जुंपलंय. काळीज पिळवटून टाकणारी ही दृश्यं आहेत परभणी जिल्ह्यातील पिंगळी इथली. बाबूराव राठोड या शेतकऱ्याने सात एकर जमीन ठोक्याने केलीय. त्यात उसनवारी करून पेरणी केली. पिकंही वाऱ्याला लागली. मात्र कोळपणी करायला बैल नाहीत आणि कोळपणीसाठी एकरी एक हजार रुपये देणं परवडत नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी पित्याला स्वतःच्या लाडक्या लेकींना औताला जुंपण्याची वेळ आलीय.


दुष्काळग्रस्त बापाची कहाणी

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राठोड यांच्या कुटुंबात आठ सदस्य आहेत. त्यात पाच मुली आणि एक मुलगा आहे. घरची शेती नाही. कुणाचीही शेती ठोक्याने करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सततच्या दुष्काळामुळे त्यांचा शेती व्यवसाय तोट्यात आल्याने चार वर्षांपूर्वी बाबूराव राठोड कर्जबाजारी झाले. कर्ज फेडण्यासाठी पाचही मुलींच्या हातातलं पेन सुटलं आणि शेतीकामासाठी हाती शेती अवजारं घ्यावी लागली. त्यांना ऊस तोडणीचं काम करावं लागलं. आता या लेकींनी अनवाणी पायानं स्वतःला औताला जुंपत बापाचं कर्ज फेडण्याचा निर्धार केलाय.


दुष्काळग्रस्त बापाची कहाणी

कमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झालाय. चार वर्षांच्या दुष्काळामुळे कंबरंड मोडलेल्या शेतकऱ्याची अवस्था आणखी बिकट झालीय. कर्जबाजारीपणामुळे लेकींना औताला जुंपावं लागणं यावरून मराठवाड्यातला दुष्काळ किती भीषण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.