जावेद मुलानी, झी मीडिया : बारामती तालुक्यातील पिंपळी येथे क्षणिक रागाच्या भरात केलेले कृत्य एखाद्याच्या जिवावर बेतते याचा प्रत्यय आज पहाटे आला. नवरा बायकोमध्ये झालेल्या भांडणानंतर आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहीतेच्या दोन चिमुकल्यांचा यात दुदैवी अंत झाला आणि आई यातून वाचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती तालुक्यातील पिंपळी येथील अतुल सूर्यवंशी व अंजली सूर्यवंशी (रा. पिंपळी, ता. बारामती) या दोघांमध्ये रात्री वादावादी झाली होती. नंतर हा वाद मिटवण्यात आला होता. परंतु पहाटे रागाच्या भरात पिंपळी येथील खाडीच्या पाण्यात आत्महत्या करण्याचा अंजली सूर्यवंशी यांनी  निर्णय घेतला. पहाटे तीनच्या सुमारास राग अनावर असल्याने त्या वेगाने दोन्ही मुलांना घेऊन पाण्याकडे गेल्या. मुलांसहीत तीने पाण्यात उडी मारल्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर शेजारीच दुध डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारून या तिघांनाही बाहेर काढले.


तिघांना उपचारासाठी शहरातील सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे नेण्यात आले. परंतु येथील डॉक्टरांनी या दोन्ही मुलांना मृत घोषित केले.तर या महिलेवर सिल्वर जुबली हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. क्षणिक रागाने दोन चिमुकल्यांचा आज दुर्देवी अंत झाला. या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. पुढील तपास बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करत आहेत.