कल्याण : कल्याण डोंबिवली दरम्यान कचोरे खाडीत पाण्याच्या मधोमध एका खडकावर सापडलेल्या दोघा लहानग्यांच्या वडिलांचा शोध लागला आहे. मात्र या मुलांच्या आईचा शोध अजूनही सुरूच आहे. सुब्रतो साहू असं मुलांच्या वडिलांचं नाव आहे. लॉकडाऊनमध्ये सुब्रतो बेरोजगार झाले. त्याच काळात त्यांच्या पत्नीचं ब्युटी पार्लरही बंद झालं होतं. घरात पैशांची चणचण असल्यानं, या जोडप्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या मुलांच्या आईने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला स्थानिकांना चारही बाजूंनी पाणी असलेल्या एका खडकावर दोन लहान मुलं रडत असल्याचं दिसलं होतं. त्यापैकी एक मुलगा दोन वर्षाचा आणि दुसरा अवघं 3 महिन्यांचं बाळ होतं. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांचा शोध सुरू केला. घटनास्थळी आढळलेल्या मोबाईलच्या आधारे मुलांच्या वडिलांना पोलिसांनी शोधून काढलं आहे.