मावळ, पुणे : मावळमधून राष्ट्रवादीकडून कोण उभे राहणार हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा धडाका लावला आहे. काल विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आज पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडकारांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी गणपतीचा अभिषेक आणि आरती केली. उमेदवारीबाबत बोलणं त्यांनी टाळलं असलं तरी 'पक्षाचं काम करतोय' असं त्यांनी सांगत आपली उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचंच एकप्रकारे स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन पार्थ पवारांनी मावळ प्रचाराचा नारळ तर फोडला नाही ना? अशी चर्चा आता मावळमध्ये सुरू झाली आहे.


धनंजय मुंडेंचा पार्थला पाठिंबा


गेल्याच महिन्यात, मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं होतं. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. 


पार्थ पवार यासाठीही आले होते चर्चेत...


जुलै २०१३ मध्ये एका नाईट क्लबमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून पार्थ पवार यांनी आणि त्यांच्या मित्रांनी आपल्या मित्राच्याच गाडीची तोडफोड केली होती... आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे बराच वेळ चर्चेतही होता. परंतु, कार तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा कसलाही संबंध नसून ही घटना घडली तेव्हा पार्थ घरी होता, असा दावा करत अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर आरोपकर्ते नदीम मेमन यांनीही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पार्थ पवार नसल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकला.