पावनखिंडित दारुड्यांची मैफल, `शिवराष्ट्र`च्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
`शिवराष्ट्र` या संस्थेची १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड ट्रेकिंग मोहीम सुरू होती
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पित बसलेल्या २० ते २५ मद्यपींना 'शिवराष्ट्र' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः चोपून काढलं. पावनखिंडीत गाड्या लावून मद्यपी दारू पित बसले होते. त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डावर महाराजांचा पुतळा होता. नंबर प्लेटवर महाराजांचं चित्रं होतं. त्यामुळे संतापलेल्या शिवभक्तांनी कार्यकर्त्यांना चोप दिला.
'शिवराष्ट्र' या संस्थेची १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड ट्रेकिंग मोहीम सुरू होती. १५ जुलैला मोहिमेचा समारोप झाला. त्यानंतर हे कार्यकर्ते पांढरपाण्याच्या दिशेने निघाले होते.
पावनखिंड पार्किंग परिसरातच पाच ते सहा गाड्यांमध्ये वीस ते पंचवीस जण दारू पित बसले होते. ही माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी गाड्यांची झडती घेतली आणि मद्यपींना गाडीतून बाहेर काढून धरून चोप दिला.
पावनखिंड परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.