PDCC Bank Election : जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व, पण एका जागेने `जागा दाखवली`
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांना धक्का, प्रतिष्ठेची जागा भाजपने जिंकली
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. २१ पैकी तब्बल २१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले तर दोन जागांवर भाजपने विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागा जिंकल्या असल्या तरी चर्चा झालीय भाजपने जिंकलेल्या जागांची. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद (Pradeep Kand) यांनी सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव केला. हा पराभव अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.
जिल्हा बँकेच्या कार्यकिर्दीत पहिल्यांदाच विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करत पुणे जिल्हा बँकेत प्रवेश केल्याचा इतिहास घडला आहे.
राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रचारात प्रदीप कंद यांच्यावर टीका करत त्यांना त्यांची जागा दाखवा असं म्हटलं होतं. पण मतदारांनी प्रदीप कंद यांच्या पाठिमागे उभं राहत त्यांना विजयी केलं. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामतीतच प्रदीप कंद यांना निर्णायक ५२ मतं पडली आहेत.
तर मी शांत राहिलो असतो
अजित पवार माझ्या विषयी बोलले नसते तर मी शांत राहिलो असतो, मात्र त्यांच्या बोलण्याचा मला फायदाच झाला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले प्रदीप कंद यांनी दिली आहे. प्रदीप कंद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असून आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण त्यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.