निरोगी आरोग्य, प्रदुषण मुक्तीसाठी पंढरीची `सायकल वारी`
आषाढीनिमित्त वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत.
मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : आषाढीनिमित्त वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत वारीला जातात. मात्र परभणी जिल्ह्यातील काही मंडळीनी निरोगी आरोग्य आणि प्रदुषण मुक्त परिसराचा संदेश देत सायकलीवर पंढरपूरला निघाले आहेत. सध्या त्यांचा मुक्काम उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात होता.
दरदिवशी १०० किमी प्रवास करत ही मंडळी पंढरपूरला पोहोचणार आहेत. एकूण २२ जण असलेल्या या वारकऱ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, राजकिय नेते, व्यापारी, विद्यार्थी यांचा समावेश आहे. सायकलिंग करत प्रवास केल्याने विठ्ठलाची वारीही होते आणि प्रदुषणही होत नाही. तसंच सायकलिंग आरोग्यासाठी उपायकारक असते, असं या सायकलने वारी करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
सायकलवरून हे वारकरी २१ जूनला परभणीवरुन पंढरपूरसाठी निघाले. १०० किलोमीटर प्रवास करत उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे त्यांनी मुक्काम केला आणि सकाळी तुळजापूरसाठी रवाना झाले आहेत. आज रात्री तुळजापुरात मुक्काम करून सकाळी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघणार आहेत. या २२ जणांमध्ये सर्वच क्षेत्रातील आणि वयोगटातील लोकं आहेत. जे मोठ्या ऊर्जेने प्रदुषण मुक्ती आणि निरोगी आरोग्याचा संदेश देत शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहेत.
या मंडळींचा परभणी ते पंढरपूर असा एकूण प्रवास जवळपास ३५० किलोमीटर आहे. परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातून हे लोक सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. प्रवासादरम्यान आणि आपत्तीच्या वेळी लागणाऱ्या सर्व वस्तू या सगळ्यांनी सोबत ठेवल्या आहेत. शिवाय सायकल पंक्चर झाल्यास पंक्चर काढण्याची साधनं, अन्य दोन ट्यूब, पावसापासून बचावासाठीचे साहित्यदेखील यांनी सोबत बाळगली आहेत. सायकल चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी यांनी घेतली आहे. गावातून जाताना गावकरी सायकलवर वारीला निघालेल्या या वारकऱ्यांना बघायला गर्दी करत आहेत. तसंच त्यांना पुष्पगुच्छही देत आहेत.