पुणे : कोरोना स्थिती आटोक्यात आल्यास चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यास दिवाळीनंतर 100 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. बालगंधर्वमध्ये त्यांच्या हस्ते रंगमंच पूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजविण्यात आली. त्यांनंतर नटराजाचे तसेच रंगमंचाच पूजन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यात आली आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृहांत 50 टक्के प्रेक्षकांची मर्यादा असणार आहे. तसेच कोरोना नियमांचं पालन सक्तीचे करण्यात आले आहेत. प्रेक्षकांना तसेच कलाकारांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे आजपासून जलतरण तलावही खुले होणार आहेत.


बालगंधर्वमध्ये आज नटराजाचे तसेच रंगमंचाच पूजन झाले. याप्रसंगी कलाकारांनी पारंपरिक गण तसेच गणेशाची प्रार्थना सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या रांगेत बसून त्याचा आस्वाद घेतला. यावेळी अजित पवार म्हणाले, परिस्थिती अशीच सुधारत राहिली तर दिवाळीनंतर नाट्यगृहामध्ये 100 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात येईल.


मुंबईची चित्रपटसृष्टी बाहेर जाऊ जाऊ देणार नाही. चित्रपटसृष्टीला सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले. दरम्यान, पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या  पुनर्विकासबाबत दोन मतप्रवाह आहेत. पुनर्विकास करत असताना कलाकारांची अडचण व्हायला नको. यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांशी बोलणार आहोत, असे ते म्हणाले.