कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत. ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांनी 7 जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात सत्यनारायणाची पूजा करून कारभाराला सुरुवात केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणाची पूजा केल्या प्रकरणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याच सांगत भादवी कलम 406 प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची 30 जून रोजी राज्यभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ विधी पार पडली. या शपथ विधीनंतर आपण स्थापित केलेली सत्ता सुरळीत सुरु राहावी यासाठी 7 जुलै रोजी मंत्रालयाच्या दालनात सत्यनारायण पूजा करून कारभाराला सुरुवात केली होती. 


पण याच सत्यनारायण पूजेचा विरोध दर्शवत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात भादवी कलम 406 प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयातून न्याय न मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा धनाजी सुरोसे यांनी दिला आहे. 


एखाद्या शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजा करणे हे शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं ही उल्लंघन केलं आहे. या कृतीमुळे धर्मनिरपेक्षित असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्यात तसेच समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले गेले असल्याचा आरोप याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी केला आहे. 


मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे. त्यांनी कोणत्याही धर्माची, पंथाची बाजू न घेता, कोणत्याही धार्मिक वादाला अनुसरून काम करू नये असं असताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करताना 7 जुलै 2022 रोजी आपल्या दालनात सत्यनारायण पूजन केली. हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध, अवमान, करणारे आहे. भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही. 


याप्रकरणी भादवि कलम 406 प्रमाणे एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत. शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे. तरी त्यांच्या विरोधात तक्रार क्रमांक 1676/2022 प्रमाणे न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी ठाणे यांच्या न्यायालयात सुरोसे यांनी तक्रार केली आहे