अकोला : देशभरात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीने जनता त्रस्त झालीय. पेट्रोल टाकून गाडी चालवावी की नाही असा प्रश्न वाहनधारकांना पडलाय. त्यात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल संदर्भात मोठं विधान केले आहे.येत्या 5 वर्षांनंतर पेट्रोलची गरज राहणार नाही असे विधान गडकरी यांनी केली आहे. या विधानामुळे आता पेट्रोल चालणाऱ्या गाड्यांच करायचं का असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावू लागला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांना विद्यापीठातर्फे 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. 


शेतकऱ्यांनी ऊर्जा दाता बनावे 
 केंद्रीय मंत्री म्हणाले की, विदर्भात बनवलेले बायो इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. तसेच विहिरीच्या पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार करता येतो, त्याची किंमत 70 रुपये प्रति किलोपर्यंत असू शकते, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर बोलताना गडकरी म्हणाले की, शेतात गहू, तांदूळ, मका उत्पादन करून भविष्य बदलता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता बनण्याऐवजी ऊर्जा दाता बनण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.  


वाहनांची पेट्रोल-डिझेलपासुन सुटका करण्यासाठी देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांवर भर दिला जात आहे. यासाठी इलोन मस्कच्या टेस्ला सारख्या इलेक्ट्रीक कार बनवणाऱ्या कंपन्यासोबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. 


दरम्यान पेट्रोल संदर्भात बोलताना गडकरी म्हणाले की, येत्या 5 वर्षांनंतर पेट्रोलची गरज राहणार नाही. तसेच तो दिवस दूर नाही जेव्हा दुचाकी आणि चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर धावतील असे त्यांनी सांगितले आहे. देशात संध्या सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या विचारात त्यालाच अनुसरून गडकरींनी पेट्रोल संदर्भात वक्तव्य केले आहे.