प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : शाळेच्या आणि क्लासेसच्या पिकनीक जीवघेण्या बनल्या आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात पिकनकच्या बसला अपघात(Picnic bus accident) झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे(Mumbai Pune Expressway ) वर देखील पिकनिकच्या बसला अपघात झाला आहे.  या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय... मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासेसचे 10 वीच्या वर्गातील 48 विद्यार्थी आणि 2 शिक्षक या बसनं लोणावळा इथं ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना बोरघाट इथं उतारावर ही बस उलटली. दुर्दैवानं या अपघातात एक मुलगा व एक मुलगी असा दोघांचा मृत्यू झाला आहे. 


एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.  जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


परभणीत पिकनीकच्या बसचा अपघात


परभणीमध्ये स्कूल बस आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून, 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीनं परभणी शहरात उपचारासाठी हलवण्यात आलंय. गंगाखेडच्या खंडाळी गावाजवळ हा अपघात झाला. संत जनाबाई विद्यालयाच्या चॅप्लिन इंग्लिश स्कूलची बस विद्यार्थी आणि पालकांना घेऊन चाकूरला वॉटर पार्क पाहण्यासाठी गेली होती. परत येत असताना अहमदपूरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या बसला समोरासमोर धडक  बसली.