कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : राजकारण खरे तर पिंपरी चिंचवडचा श्वास. अर्थात राज्यातील ताकतवान नेते असलेल्या अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून त्याला अधिकच वलय. परंतू २०१७ मध्ये महापालिका निवडणुकांमध्ये त्यांचा हा बालेकिल्ला ध्वस्त झाला आणि अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावे लागले. पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपला जबरदस्त यश मिळाले आणि त्यांचा उत्साह शिगेला पोहचला. त्यानंतर भाजपकडून पारदर्शक कारभाराची अपेक्षा असताना अगदी सुरुवातीच्या वर्षापासूनच भाजपवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले. भाजपच्या या भोंगळ कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड आघात करणे अपेक्षित होते. विरोधात बसण्याची सवयच नसलेल्या राष्ट्रवादीला गेली चार वर्ष ते जमले नाही ही वस्तूस्थिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांचा राष्ट्रवादीवर एक हाती वचक असला तरी सत्ताधारी भाजप विरोधात प्रत्येकवेळी लक्ष घालणे पवारांना शक्य नाही. त्यामुळे शहरातील स्थानिक नेत्यांनी भाजप विरोधात रान उठवणे अपेक्षित होते आणि आहे. परंतू राष्ट्रवादीचे नगरसेवक काय किंवा स्थानिक नेते काय, अनेकांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी संबंध आहेत. काही नगरसेवकांचे पालिकेतल्या अनेक कामांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हितसंबंध आहेत. 


जिथे राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच आर्थिक हितसंबंध जोडले गेले आहेत तिथे या नेत्याकडून विरोध होणार कसा हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे व्यक्ती म्हणून चांगले असले तरी राजकारणात अपेक्षित डावपेच त्यांना जमत नाहीत. राजकारणात जो बेरकीपणा लागतो तो त्यांच्यात नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यांचा आदर करत असले तरी त्यांचा पक्षावर म्हणावी तशी पकड नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. 



कधीकाळी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्याकडे शहरात लक्ष्मण जगताप, विलास लांडे आणि आझम पानसरे यांच्यासारखे मात्तबर नेते होते. परंतू आता विलास लांडे वगळता राष्ट्रवादीकडे एक ही मोठे नाव स्थानिक पातळीवर नाही. अशा स्तिथीत विलास लांडे यांनी राष्ट्रवादीची सूत्रे हातात घेत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतू बेभरवसा स्वभाव, जवळच्या लोकांना दुखावणे, जवळपास संपत आलेल्या विश्वासार्हतेमुळे लांडे यांना पक्षात ही मानणारा वर्ग कमी झालाय. 


महापालिका निवडणुकीत केवळ मुलाच्या विजयाकडे लक्ष देणाऱ्या विलास लांडे यांनी गेल्या चार वर्षात कसलेही आंदोलन केलेले नाही किंवा एखाद्या प्रश्नावर सत्ताधार्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे विलास लांडे यांचे वैक्तिक राजकारण ही निष्प्रभ ठरत आहे आणि त्यांचा पक्षाला ही काही उपयोग होताना दिसत नाही. 


राष्ट्रवादीच्या शहरातील दुसऱ्या फळीतील नेत्यांबाबत तर ते करतात काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पक्षापेक्षा स्वतः चे हित साधण्यात त्यांची धन्यता आहे. नाही म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार अमोल कोल्हे यांनी महापालिका प्रश्नात लक्ष घालणार असे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी भाजपवर काही लगाम लागेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. 


अमोल कोल्हे शहरासाठी 'ईद का चाँद'च ठरले आहेत. केवळ प्रसिद्धी तंत्राचा उत्कृष्ट वापर करण्याचे कसब असले म्हणजे राजकारण यशस्वी होते हा भ्रम त्यांनी दूर केला आणि खरंच शहराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले तर शरवासियांना आणि त्यांच्या पक्षाला ही फायदा होईल. परंतू गेल्या काही महिन्यातील त्यांचा वावर पाहिला तर ते काही करतील का हा प्रश्नच आहे. 


आगामी निवडणुकात भाजपला टक्कर देईल असा नेता सध्यातरी  राष्ट्रवादीकडे नाही. महेश लांडगे यांनी त्यांचा भोसरी मतदारसंघ बांधून ठेवलाय तर प्रत्येक कृती करताना राजकारणाचा विचार करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना तोड देणारा नेताच राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला शहरात गतवैभव मिळवायचे असेल तर नव्या नेतृत्वाला संधी देत ते नेतृत्व तयार करण्याची गरज निर्माण झालीय. 


आज ही अजित पवार हेच पिंपरी चिंचवड चे सर्वमान्य नेते आहेत. त्यांची जागा घेणे लक्ष्मण जगताप ना महेश लांडगे यांना जमले आहे आणि ना जमण्याची शक्यता आहे. परंतू राष्ट्रवादीचे स्थानिक कचखाऊ नेते आणि दिशाहीन झालेल्या पक्ष संघटनेमुळे सध्यातरी मदमस्त सत्ताधीश आणि निष्क्रिय विरोधक असे शहराच्या राजकीय स्तिथीचे वर्णन करता येईल.