पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच `आमचं ठरलंय`चा ट्रेंड
विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांचा सोशल मीडियावर प्रचार
कैलास पुरी, झी 24 तास पिंपरी-चिंचवड : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. खास करून पिंपरी विधानसभा मतदारसंघात तर युतीतलेच चार-पाच जण इच्छूक आहेत. आमचं ठरलंयने एकच रंगत आणली आहे. लोकसभा निवडणुकीत सुरू झालेला आमचं ठरलंयचा ट्रेंड विधानसभा निवडणुकी पूर्वीच पिंपरीमध्ये पाहायला मिळत आहे.
भाजप नगरसेविका सीमा सावळे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या कॅम्पेनमुळे भाजप समर्थकांनी सावळे यांना उमेदवारी घोषित करत आमचं ठरलंय याचा धुमाकूळ सोशल मीडियावर सुरू केला आहे. तो सुरू होताच सेनेकडून इच्छूक असलेल्यांनी ही पलटवार करत आमचं तुमच्या आधीच ठरलंय अशी सुरुवात सोशल मीडियावर केली आहे. या दोघांचा वाद सुरू असताना आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्या समर्थकांनी तुमचे काही ही ठरू द्या आमचे आधीच फिक्स झाले असे मेसेज व्हायरल करायला सुरुवात केली आहे.
पिंपरी विधानसभा ही आरपीआयची आहे याची आठवण त्यांनी मॅसेजमधून सेना-भाजपला करून दिली आहे. एकीकडे हे वाद सुरू असतानाच भाजप मधूनच अमित गोरखे आणि खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे यांच्या समर्थकांनी ही त्यांच्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं आहे.
एकूणच काय तर लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पिंपरी विधानसभा मतदारसंघात युती मधल्या इच्छूकांचे आमचे ठरलंय जोमात सुरू आहे. कॅमेऱ्यावर कोणी आत्ताच इच्छूक असल्याचे सांगत नसले तरी युद्ध सुरू झालंय हे मात्र नक्की. पण स्थानिक नेत्यांनी कितीही ठरवले तरी शेवटी निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. हे तितकंच खरं पण तूर्तास आमचं ठरलंयने पिंपरीमध्ये मात्र रंगत आणली आहे.