ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तरुणाला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
ड्रेनेजखाली गाडल्या गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेले अग्निशमन दलाचे चार जवानही अडकले होते
कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी - चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या दापोडीमध्ये ड्रेनेजचं काम करण्यासाठी गेलेला एक तरुण अडकलाय. त्याला वाचवण्यासाठी गेलेले अग्निशमन दलाचे चार जवानही अडकले होते. यातल्या सरोज पुंडे आणि निखिल गोगावले या दोन जवानांना वाचवण्यात यश आलंय. तर अग्निशमन दलाच्या एका जवानाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झालाय. अडकलेला तरुण आणि एका जवानांला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव या जवानाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. 'कर्तव्य बजावताना घटनेत शहिद झालेल्या जाधव यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी म्हटलंय. प्रथमदर्शनी ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचा आणि तत्काळ दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय. घटनेस जबाबदार असलेल्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार असल्याचं हर्डीकर यांनी म्हटलं.
ड्रेनेज काम करताना ढिगाऱ्याखाली एक तरुण अडकल्याची बातमी मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीनं या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु, हे काम सुरू असताना चार जवान या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
परंतु, सावध असलेल्या अग्निशमन दलाच्या इतर अधिकाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. त्यांनी पहिल्यांदा ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सरोज पुंडे या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी निखिल गोगावले या कर्मचाऱ्यालाही सुखरुपपणे बाहेर काढलं. ड्रेनेजचं काम करणारा तरुण मात्र अद्यापही अडकलेल्या अवस्थेत असल्याचं समजतंय.