पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या
Pimpri Chinchwad Police Bharati: पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून म्हणजेच 5 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
Pimpri Chinchwad Police Bharati: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 17 हजार 531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दला अंतर्गतदेखील भरती जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 262 पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून म्हणजेच 5 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
राज्यातील पदांचा तपशील
राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस भरती केली जाणार आहे. याअंतर्गत 9 हजार 595 पोलीस शिपाई पदे, 1 हजार 686 चालक पोलीस शिपाई पदे, 4 हजार 449 सशस्त्र पोलीस शिपाई पदे, 101 बॅंण्डसमन पदे, 1 हजार 800 कारागृह पोलींस शिपाई पदे भरली जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या पदांचा तपशील
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरती अंतर्गत एकूण 262 पदे भरली जातील. यामध्ये विविध स्तरांना सामावून घेण्यात आले आहे. जसे की सर्वसाधारण उमेदवारांची 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे आरक्षित आहेत. तर माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलीस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ उमेदवारांची 3 पदे भरली जाणार आहेत.
शारीरिक आणि लेखी चाचणी
दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. तसेच अर्जदार उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. शारीरिक आणि लेखी चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणारआहे. भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना किमान 50 टक्के गुण मिळवावे लागतील. तसेच उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उमेदवारांना किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळणाऱ्या उमेदवारांचे पोलीस बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. यानंतर उमेदवाराची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पुढे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि पुढे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल,याची उमेदवारांनी नोंद घ्या
अर्ज शुल्क
पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 450 रुपये शुल्क घेतले जाईल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 350 रुपये शुल्क घेतले जाईल.
एकाच शहरातून अर्ज
राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे, याची उमेदवारांना माहिती असायला हवी. हे समजून घेण्याचे कारण म्हणजे एक उमेदवार दोन शहरांमधून अर्ज करु शकणार नाही.
अर्जाची शेवटची तारीख
31 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तत्पुर्वी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट policerecruitment2024.mahait.org.वर जाऊन अर्ज करायचा आहे.अर्ज करताना उमेदवारांनी अचूक कागदपत्रे द्यावी. अर्ज दिलेल्या मुदतीनंतर आल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास तुमच्या मेहनतीवर पाणी फिरु शकते. त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरा.