नाशिक : धक्कादायक बातमी. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात पिस्तूल सापडले. चौदा वर्षांचा मुकगा शाळेत प्रवेश करत असताना त्याच्या हालचालीवरून वॉचमनला संशय आला. यावेळी त्याची तपासणी केली तेव्हा चक्क त्याच्या दप्तरात पिस्तूल आढळून आले. गुरुवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला. शाळेने शनिवारी भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील एका नामांकित शाळेत हा सगळा प्रकार घडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका, दोन शिक्षक आणि वॉचमन यांनी भद्रकाली पोलिसांना लेखी माहिती देत पिस्तूल जमा केले आहे. मात्र मुलाकडे पिस्तूल कसे आले याची माहिती मिळू शकलेली नाही. 


मुलाच्या दप्तरात छरऱ्याची गन मिळाली आहे. वॉचमनला त्याच्या हालचालीवरून त्याच्याकडे मोबाईल असावा असा संशय आला होता. मात्र त्याचे दप्तर तपासले त्यात गन आढळून आली आहे. हा मुलगा इंग्लिश मीडियम स्कुलच्या नववीच्या वर्गात शिकतो. तीन दिवसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि वॉचमन यांनी लेखी माहिती दिली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. शाळेने तक्रार उशिरा दिली आहे. मुलाकडे गन कशी आली या अनुषंगाने तपास सुरू केला आहे, अशी माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली.