पीएम मोदींचा अजित पवारांच्या खांद्यावर हात, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
आगामी काळात राज्यातील राजकीय चित्र बदलणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते आज श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर मोदींची सभा झाली. यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेण्यात आलं आहे. सुमारे 11 हजार कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू इथं केली.
पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत
त्याआधी पंतप्रधान मोदी यांचं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात जोडून पंतप्रधान मोदींचं वेल कम केलं. पंतप्रधान मोदींनीही स्वागताचा स्विकार करत अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला.
पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरला झाला असून राजकीय वर्तुळात या फोटोची चर्चाही सुरू झाली आहे. आगामी काळात राज्यातील राजकीय चित्र बदलणार का अशी चर्चा रंगली आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन शपथ घेतली. हे सरकार ऐंशी तास टिकलं. आता पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर पुन्हा एकदा पहाटेच्या त्या शपथविधी चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदी यांचा हात असाच राहिला तर राज्यातील सत्तेची समकिरणे पुन्हा बदलू शकतात, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
देहूत पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची सुरुवात प्रार्थनेने झाली. आमचे जीवन संतांची कृपा आहे. संतांची कृपा लाभली तर ईश्वराची कृपा लाभते. त्याची अनुभूती देहूमध्ये घेत आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे, अशी माहिती मोदी यांनी यावेळी दिली.