नवी दिल्ली : भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेत्यांनी ट्विटद्वारे दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता  जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या आगीतून ७ बालकांना वाचवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, भंडाऱ्यातील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. महाराष्ट्रातल्या अनमोल अशा नवजात बालकांचा जीव गेला. सर्व पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही आशा.



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.



विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ही  घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी.



राहुल गांधी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ही घटना दुखद असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारला संभव ती मदत करण्याचं आवाहन केलं आहे.