PM Modi Offer To Ajit Pawar: राज्याच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाविरोधात बंडखोरी करुन राज्यातील शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या भेटींमुळे उलट सुलट चर्चांना उधाण आहे आलं. काही दिवसांपूर्वीच अजित पवार पुण्यातील एका व्यवसायिकाच्या बंगल्यावर शरद पवारांना गुपचूप भेटल्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये आहे. पवार काका-पुतण्यांच्या या भेटीसत्रामुळे महाविकास आघाडीतही बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शरद पवार यांनी आपण भाजपाबरोबर जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तरीही महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार गटाशिवाय निवडणुका लढण्यासंदर्भातील चर्चा सुरु असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अजित पवार का इतके प्रयत्न करत आहे यासंदर्भात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी धक्कादायक दावा केला आहे. शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा वड्डेटीवार यांनी केला आहे.


पवारांच्या पाठींब्यासाठी भाजपाची धडपड सुरु असल्याचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे. "2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे," असं वड्डेटीवार म्हणाले. यापुढे जात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत वड्डेटीवार यांनी अजित पवारांना भाजपाने ऑफार दिल्याचंही म्हटलं आहे.


मोदींची अजित पवारांना ऑफर?


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत," असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार सोबत आले नाहीत तर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही असं वड्डेटीवार यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. 


पवार महाविकास आघाडीसोबत की...


मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पवार काका-पुतण्या भेटींच्या सत्रासंदर्भात बोलताना वड्डेटीवार यांनी,  "शरद पवार साहेब आमच्या सोबत आहेत. आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. आम्ही आज त्यांच्या भाषणाची प्रतीक्षा करू. शरद पवार आज भाषणातून काय म्हणतात कुठल्या दिशेने त्यांचा विचार आहे याबद्दल बोलतील. आम्ही तिघे एकत्र आहोत. मात्र तो संभ्रम लवकर दूर होईल आणि महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला समोर जाईल," असा विश्वास वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.