PM मोदींचा मुंबई दौरा, ठाणे- बोरीवली दुहेरी मार्गाचे भूमिपूजन करणार; काय आहे हा प्रकल्प?
Twin Tunnel Project: पंतप्रधान मोदी शनिवारी 13 जुलै मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे भूमीपूजन केले जाणार आहे.
Twin Tunnel Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींकडून अनेक प्रकल्पांचे भूमीपूजन केले जाणार आहे. यामध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा या सारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन शनिवारी 13 जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड अंतर्गंत बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाअंतर्गंत 4.7 किमी लांबीचे आणि 45.70 मीटर रुंदीचे दोन बोगदे उभारण्यात येणार आहे.
सुरुवातीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असलेला हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. सुरुवातीला 11,235.43 कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प 2023मध्ये 16,600.40 कोटी रुपयांव गेला आहे. आता शनिवारी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे भूमीपूजन होणार आहे. दुहेरी बोगद्यामुळं ठाणे आणि बोरीवली ही दोन उपनगरे जवळ येणार आहेत. तसंच, बोगद्याकडे येणे-जाणे सोपे व्हावे यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रस्त्यावर अंदाजे 700 मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तेथेच अंदाजे 500 मीटरचा बोगदा आणि बोरीवलीच्या दिशेने 850 मीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे.
दुहेरी बोगद्यामुळं मुंबईकरांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांह आपत्कालीन मार्गदेखील असणार आहे. या प्रकल्पातील बोगद्याचे काम आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाइटचे संकेत फलक इत्यादी अत्याधुनिक सुविधादेखील उभारण्यात येणार आहे.
सध्या ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागतो. ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळंच ठाणे-बोरीवली प्रकल्प हा गेमचेंजर ठरणार आहे. ठाणे ते बोरीवली अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळं इंधनाची तर बचत होईलच पण वेळही वाचणार आहे. काम सुरू झाल्यापासून पाच वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2029 ते 30 पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण होऊ शकते. भूमीपूजन झाल्यानंतर भुयारीकरणाच्या कामाला साधारण नऊ-दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.