नाशिक: भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी गुरुवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चला पुन्हा आणुया आपले सरकार' अशी घोषणा देत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी पहिल्या १०० दिवसांमध्ये केंद्र सरकारने कृषी, संरक्षण, सुरक्षा आणि पायाभूत क्षेत्रात घेतलेल्या निर्णयांचा आवर्जून उल्लेख केला. गेली अनेक वर्षे राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले. मात्र, आता महाराष्ट्राला फडणवीस सरकारच्या रुपाने स्थिर राजकारण करण्याची एक संधी आहे. ही संधी महाराष्ट्रातील जनतेते सोडू नये, असे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचे कौतुकही केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. याशिवाय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि नव्यानेच भाजपवासी झालेले उदयनराजे भोसलेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेत नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. यानंतर त्यांनी उदयनराजे भोसले यांचा आवर्जून उल्लेख केला. छत्रपती उदयनराजेंनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवले. हा माझा सन्मानही आहे आणि एकप्रकारची जबाबदारीही आहे, असे मोदींनी सांगितले.


यावेळी मोदींनी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर विरोधकांकडून सुरु झालेल्या राजकारणावरही ताशेऱे ओढले. अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भारतीय प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधक यामध्येही राजकारण करू पाहत आहेत. या सगळ्यात काँग्रेसची होणारी राजकीय अडचण मी समजू शकतो. मात्र, शरद पवारांसारखा अनुभवी नेताही चुकीची भूमिका घेतो याचे मला दु:ख वाटते. विरोधकांनी आमच्यावर जरुर टीका करावी. पण यानिमित्ताने दहशतवादाला पोसणाऱ्यांना अपप्रचार करण्याची संधी देऊ नये, असे आवाहन मोदींनी केले. 


विशेष म्हणजे यावेळी नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराविषयीच्या मुद्द्यालाही अनपेक्षितपणे हात घातला. त्यांनी म्हटले की, गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळ लोक राम मंदिराविषयी बेताल वक्तव्ये करत आहेत. मात्र, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मग असे असताना हे वाचाळवीर अखंड बडबड का करत आहेत, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. तसेच आपल्या देशाचे संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. त्यामुळे मी वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, किमान श्रीरामासाठी तरी देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा. दरम्यान, मोदींच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळाला पडला आहे.


 


मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:


​​​* चला पुन्हा आणुया आपले सरकार- मोदी
​​* मी वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, किमान श्रीरामासाठी देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा-मोदी
​​* आपल्याला न्यायव्यवस्था आणि संविधानावर विश्वास असला पाहिजे- मोदी
​​* अयोध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना वाचाळवीर का बडबडत आहेत- मोदी
​​* सर्वोच्च न्यायालयाविषयी सन्मान असला पाहिजे- मोदी
​​* गेल्या दोनतीन आठवड्यांपासून काही वाचाळ लोक राममंदिराविषयी बेताल विधाने करत आहेत- मोदी
​* दिवसरात्र महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या विचारसरणीला पाठिंबा देण्याची गरज- मोदी​
* महाराष्ट्रातील पर्यटन आणि उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न- मोदी​
* महाराष्ट्र पाण्याच्याबाबतीत संपन्न झाला तर राज्याचा विकास कोणीही रोखू शकत नाही- मोदी
​* मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर प्रश्नावर घेतलेली भूमिका दुर्दैवी- मोदी​​​
* मात्र महाराष्ट्राला दहशतवादाला खतपाणी कुठून घातले जाते, हे चांगले माहिती आहे- मोदी
​​​* शरद पवारांना पाकिस्तान चांगला वाटतो- मोदी
​​​* मतांसाठी शरद पवारांसारखा नेता चुकीची भूमिका घेतो तेव्हा दु:ख होते- मोदी
​​​* मला काँग्रेसची राजकीय अडचण समजते, पण शरद पवारांसारखा अनुभवी नेता असा का वागतो- मोदी
​​* अनुच्छेद ३७० च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भारतीय प्रयत्नशील, मात्र काँग्रेसचे नेते खोडा घालत आहेत- मोदी
​​* विरोधक याठिकाणीही राजकीय स्वार्थ साधू पाहत आहेत- मोदी
​* काश्मीरमधील लोकांना रोजगार आणि विकास हवा आहे- मोदी
​* सीमेपलीकडून अस्थिरता आणि अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न- मोदी​​​​​​​​
* तुम्ही काश्मीरच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणार का?- मोदी
​​​​​​​* आता 'काश्मीर हमारा है' नव्हे तर 'हमे नया कश्मीर बनाना है' हा नारा देण्याची गरज- मोदी
​​​​​​* अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या माझ्या निर्णयावर तुम्ही खुश आहात का?- मोदी
​​​​​​* अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय १३० कोटी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्ती- मोदी
​​​​​* गेल्या पाच वर्षात आम्ही केवळ भारतीय लष्करलाच बुलेटप्रुफ जॅकेट पुरवली नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्यास सुरुवात- मोदी
​​​​​* भाजप सत्तेत आल्यानंतर बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली- मोदी 
​​​​​* २००९ पासून सैनिकांना बुलेटप्रुफ जॅकेटची गरज होती, मात्र काँग्रेसने दुर्लक्ष केले- मोदी
​​​​​* संरक्षणक्षेत्रात पूर्वीच्या सरकारांनी काय केले, हे आपण कायम ध्यानात ठेवले पाहिजे- मोदी
​​​​* मोदींकडून कृषी, लष्करी आणि सुरक्षा क्षेत्रातील निर्णयांचा उल्लेख
​​​* सरकारच्या प्रत्येक योजनेकडे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहू नये, आम्ही देशासाठी काम करतो- मोदी
​​* महाराष्ट्रातील राजकीय पंडितांनी त्यांचा दृष्टीकोन बदलावा- मोदी
​* पंतप्रधान कृषी योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली- मोदी
* पहिल्या १०० दिवसांच्या काळात आमच्या सरकारने काय काम केले ते तुमच्यासमोर आहे- मोदी
* ​​देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा स्थिर राजकारणाची संधी आहे - नरेंद्र मोदी
* देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मोजक्या मुख्यमंत्र्यांपैकी एक- मोदी​
* अनेक वर्षांच्या राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले- मोदी
*  नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
* छत्रपती उदयनराजे भोसलेंनी माझ्यावर डोक्यावर छत्र ठेवले आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, हा सन्मान आणि जबाबदारी आहे