नवी दिल्ली/मुंबई - सत्य आणि न्याय यांच्यासाठी लढा देणाऱ्या वीर योद्ध्याला माझे नमन, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांच्या विराट कार्याची आठवण करून देत त्यांना अभिवादन करतात. यंदाही ट्विटरच्या साह्याने त्यांनी महाराजांच्या स्मृतींना नमन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की सत्य आणि न्याय यांच्यासाठी लढा देणारे वीर योद्धा, एक आदर्श प्रशासक कसा असावा, याचे शिवाजी महाराज उदाहरणच होते. देशभक्त असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल समाजातील सर्व स्तरांमध्ये आदर होता. त्यांना माझ्याकडून विनम्र अभिवादन. जय शिवाजी.


दरम्यान, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणाऱ्या कुशल प्रशासकाची, सुशासन म्हणजे काय याचा आदर्श ठेवणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल समाजातील सर्वच लोकांमध्ये आदराची भावना आहे. ती व्यक्त करण्यासाठी सर्वजण शिवजयंती साजरी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंगळवारी सकाळी शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी लवकरात लवकर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाईल, याचा पुनरुच्चार केला.