आंबेनळी घाट अपघात : मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांचा धनादेश सुपूर्त
आंबेनळी घाटात बस दुर्घटना - राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
मुंबई : आंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये तीस जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अतिशय दुर्दैवी घटना होती. दरम्यान मृतांच्या वारसांना सरकारकडून जाहीर झालेली मदत प्रशासनाकडून देण्यात आलीय. राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. तर पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. अपघाताच्या या घटनेमुळे दापोली तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेच्यावतीने शोकसभा
डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मिनीबसला आंबेनळी घाटात अपघात झाला आणि दापोली शोकसागरात बुडाली. या अपघातामध्ये झालेल्या ३० जणांच्या मृत्यूमुळे दापोलीसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मृत कर्मचाऱ्याना श्रद्धांजली वाहण्यासाठी दापोली शिवसेनेच्यावतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
दापोली शहरातील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे युवा नेते योगेश कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.