नाशिकमध्ये पोलिसच बनला आरोपी; दिवाळीच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत केला गुन्हा
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेये. ज्यांच्या जीवावर नागरिक निर्धास्त असतात तेच गुन्हेगार ठरले आहेत. एका पोलिसानेच गुन्हा केल्याचे समोर आला आहे.
सागर गायकवाड, झी मीडिया
Nashik Crime News: सराईत चोरटे चेनस्नॅचिंग करत असल्याचे आतापर्यंत आपण पाहिले असेलच. पण, नाशिक शहरात एका पोलिस शिपायानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली होती. विशेष म्हणजे ज्याच्या मदतीने ही जबरी चोरी केली त्याच मित्राने बोभाटा केल्याने हा गुन्हा उघड झाला आहे. पोलिसानेच गुन्हा केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हेशाखा युनिट दोनने संशयित पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली असून सरकारवाडा पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. योगेश शंकर लोंढे असे संशयित पोलिस शिपायाचे नाव असून तो सध्या गंगापूर रोडवरील शहर पोलिस मुख्यालयात नियुक्तीस आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलिस आयुक्तालयाने निलंबित केले होते. निलंबन काळ संपल्यावर तो सध्या जनरल ड्युटी करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने एक महिला पायी जात होती. त्याचवेळी योगेश लोंढे हा सतरा वर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन आला. यानंतर त्याने या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केला. मात्र दुचाकीवर असल्याने तोपर्यंत त्याने पोबारा केला होता.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्यानंतर त्याचवेळी काही अंतरावर लोंढे व त्याच्या अल्पवयीन मित्रांमध्ये नशेत असताना मतभेद झाले. हे वाद पराकोटीला पोहचल्यानंतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलानेच पोलिसांना घटनेची माहिती कळवून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर व पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या मुलाकडून माहिती घेतली असतानाच शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे यांना संशयिताची माहिती समजली. त्यांच्या सूचनेने पथकाने संशयित लोंढे यास काही वेळातच ताब्यात घेतले.
आरोपी लोंढेची चौकशी केली असता तो हाच पोलिस शिपाई असल्याचे समोर आले. दरम्यान, सरकारवाडा पोलिसांत चेनस्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. तर, अल्पवयीन मुलासही त्याच्या वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.